बावधनमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी ; धमकावून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 07:50 PM2019-07-22T19:50:22+5:302019-07-22T19:52:15+5:30
फिर्यादी महिला या त्यांच्या राहत्या घरी एकट्याच होत्या...
पिंपरी : घरात एकटीच महिला असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात जाऊन महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील, कान, हात आणि पायातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅट क्रमांक ७, दुसरा मजला, दगडे पाटील व्हीला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक येथे घडली.
याप्रकरणी चंद्रभागा उत्तम दगडे (वय ४८, रा. दगडे पाटील व्हीला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २१) फिर्यादी चंद्रभागा या त्यांच्या राहत्या घरी एकट्याच होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून अज्ञात चोरटा चंद्रभागा यांच्या घरात शिरला. घरात जाताच या चोरट्याने चंद्रभागा यांचे तोंड दाबून आवाज केला तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यांच्या गळ्यातील, कान, हात आणि पायातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.