आईला गुंगीचे औषध देत दिवसाढवळ्या राहत्या घरातून बाळाची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:12 PM2021-11-30T21:12:52+5:302021-11-30T21:13:45+5:30
Theft of a baby from a house : घोडपदेव येथील घटना, काळाचौकी पोलिसांकडून तपास सुरु
मनीषा म्हात्रे
मुंबई : जुन्या मोबाईलवर बास्केट देण्याच्या नावाखाली दिवसाढवळ्या घरात शिरलेल्या महिलेने आईला गुंगीचे औषध देत ३ महिन्याच्या बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घोडपदेव परिसरात घडला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.
घोडपदेव येथील संघर्ष सदन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मगदूम कुटुंबीय राहण्यास आहे. बजरंग मगदूम यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एक महिला जुन्या मोबाईलवर भांडे विक्री करण्यासाठी आली. तिच्याकडे बाळासाठीचे बास्केट पाहून तिला घरातील जुने मोबाईल दाखवले. मात्र मोठ्या मोबाईलवरच बास्केट मिळणार असल्याचे सांगून महिला निघून गेली. त्यानंतर आईला जेवणाचा डब्बा देण्यासाठी मीही घराबाहेर पडलो. यादरम्यान पत्नी सपना आणि ३ महिन्याचे बाळ घरात होते.
मी बाहेर पडल्यानंतर काही वेळात दुसरी महिला घरी आली. सासूने पाठवल्याचे सांगत, तुमच्याकडील मोबाईल घेऊन बास्केट द्यायला आली असल्याचे सांगितले. सपना यांनी तिच्यावर विश्वास ठेवून मोबाईल आणण्यासाठी आतमध्ये वळताच पाठीमागून महिलेने तोंडाला रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. आणि बाळाला घेऊन पसार झाली आहे. काही वेळाने घरी आलेल्या नातेवाईकांना सपना बेशुद्ध दिसल्या. शुद्धीवर येताच, त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. तसेच बाळ गायब असल्याने त्या मानसिक धक्क्यात आहेत.
याप्रकरणी काळाचौकी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपी महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच स्थानिकाकडून देखील मुलीचा फोटोaआणि माहिती शेअर करून तिच्यापपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणीही या चिमुकलीला पाहिल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.