कोल्हापूर : आलिशान मोटारीतून बोकड आणि शेळ्यांची चोरी करणाऱ्या चौघांची टोळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीकडून १६ बोकड, शेळ्या व गुन्ह्यातील आलिशन मोटार, असा सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.
शिवाजी पांडूरंग कुंभार (वय ३८ रा. कनाननगर) असे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. तर किशोर नागाप्पा गायकवाड (उजळाईवाडी, ता. करवीर), दिपक शिवाजी गायकवाड (रा. यादववाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) आणि राजू बागल (रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा), अशी पसार असलेल्या संशयित साथीदारांची नावे आहेत.
दि. १८ ऑगस्ट रोजी नागाव गावच्या हद्दीतील चौगले मळ्यात अज्ञाताने उलगप्पा हणमंता अलकुंटे यांच्या मालकीच्या ९० हजाराच्या शेळ्या व बोकड चोरले. त्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस संभाजी भोसले यांना मिळालेल्या माहितीवरुन सराईत गुन्हेगार शिवाजी कुंभार याला ताब्यात घेऊन ‘खाक्या’ दाखवत चौकशी केली. त्यानुसार त्याने आणखी तीन साथीदारांसह नागाव गावच्या हद्दीतून व गिरगाव ते पाचगाव मार्गावरून शेळ्या व बोकड चोरल्याची कबुली दिली. हे गुन्हे करण्यासाठी त्यांनी एका आलिशान मोटारीचा वापर केल्याचे व किशोर गायकवाड, दिपक गायकवाड , राजू बागल अशी साथीदरांची नावे असल्याचे सांगितली. अटक केलेला शिवाजी कुंभार याचे किशोर व दिपक हे दोघे मेहुणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी भोसले, राजीव शिंदे, बालाजी पाटील, रणजित पाटील, प्रदीप पाटील यांनी केली.
उजळाईवाडीत छापा -पोलिसांनी संशयित किशोर गायकवाड याच्या उजळाईवाडीतील घरावर छापा टाकला. घरासमोरुन चोरीच्या १६ शेळ्या, बोकड व गुन्ह्यातील आलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे.