जळगाव : चोरांच्या मनात भीती व नागरिकांसाठी सवार्त सुरक्षित ठिकाण म्हणजे पोलीस ठाणे. येथे सुरक्षेची हमी असते, असे मानले जाते, मात्र पोलीस ठाणेही असुरक्षित असून महसूलच्या पथकाने पकडलेले वाळूचे डंपर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
तहसीलदारांच्या पथकातील आव्हाणे येथील तलाठी मनोहर श्रीराम बाविस्कर व ममुराबाद तलाठी विरेंद्र पालवे यांनी २२ जून रोजी रात्री १०.३० वाजता तालुक्यातील विटनेर शिवारात भूषण मंगल धनगर (रा.वैजनाथ, ता.एरंडोल) याच्या ताब्यात अवैध वाळूने भरलेले डंपर (क्र.एम.एच.४६ ए.एफ.३७६४) पकडले होते. दंडात्मक कारवाई होईपर्यंत हे डंपर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून जमा केले होते.त्याबाबत पोलीस दप्तरी त्याची नोंदही घेण्यात आलेली आहे. दरम्यान, रविवारी पोलीस ठाण्याच्या आवारातून हे डंपर गायब झाल्याचा प्रकार सायंकाळी उघड झाला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही न मिळाल्याने गोपनीयचे कर्मचारी श्रीराम बोरसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे, त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ लाखाचे डंपर व ३ हजार ४०० रुपये किमतीची वाळू असा ९ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दाखविण्यात आले आहे.