बंगळुरू - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कांद्याचे भाव कमालीचे भडकले आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने आता कांदा चोरून नेण्याचेही प्रकार घडत आहेत. असाच एक कांदे चोरीचा प्रकार बंगळुरूमध्ये समोर आला आहे. बंगळुरूमध्ये गाडीचा ईएमआय भरण्यासाठी एक ट्रक ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे 9 लाख रुपये रुपये किमतीचे कांदे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, चोरीचा प्रकार लपवण्यासाठी या आरोपींनी अपघाताची खोटी कहाणीही ऐकवली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच या सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला. बंगळुरूमधील एक ट्रक ड्रायव्हर आणि इतर काही कर्मचाऱ्यांनी गाडीचा ईएमआय भरण्यासाठी कांदे चोरीचा बनाव रचला. त्यासाठी त्यांनी कांदे वाहतूक करत असलेल्या ट्रकचा अपघात झाल्याचे नाट्य रचले. तसेच या ट्रकमधून कांद्याच्या 81 गोण्या उतरवून शहरातील बाजारात जाणाऱ्या एका वाहनातून रवाना केल्या होत्या. दरम्यान, तवारकेरे पोलीस ठाण्यातील महिला सब-इन्स्पेक्टरांना संबंधित ट्रकचालकाने दिलेल्या माहितीवर शंका आली. रात्री गस्तीवर असताना अपघातस्थळावर कुठलाही ट्रक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ट्रकचालक आणि इतरांची कसून चौकशी केली. त्यानंतर या सर्वांना ताब्यात घेतले. ट्रक ड्रायव्हर संतोषकुमार आणि चेतन यांनी आपण जाणूनबुजून ट्रकला अपघात घडवून आणल्याचे मान्य केले. या प्रकरणी कांद्यांचे व्यापारी शेख अली आणि त्यांच्या दोन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला ट्रकमालक अद्याप फरार आहे. ट्रकचे थकीत कर्ज फेडण्यासाठी त्याने अपघाताचे नाटक रचले असावे, अशी पोलिसांना शंका आहे. याबाबत अधिक माहिती देताना तपास अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रकमालकाने आपले ड्रायव्हर आणि व्यापारी अलीची मदत करण्यासाठी ही योजना आखली होती. अपघात झाल्यानंतर ट्रकच्या दुरुस्तीसाठी विम्यावर दावा करता येईल, असा त्याचा विचार होता. मात्र आनंद कुमार या शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी चोरलेल्या कांद्याच्या गोण्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला फोन केला आणि कांदे ताब्यात घेत संबंधित शेतकऱ्याला परत केले.
ऐकावं ते नवलच! ट्रकचा ईएमआय भरण्यासाठी त्यांनी चोरले कांदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 10:38 AM