पिंपरी - स्वत:च्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एकाने दुचाकीची डिक्की फोडून एक लाख २२ हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या वेळी आरोपी अनिल सॅमियल गायकवाड (वय ५४, रा. पाटील चौक, दौंड) यांनी कबुली दिली. याप्रकरणी अमोल प्रकाश रावळ (वय ३६, रा. रिव्हर रेसिडेन्सी, फेज नं. २, देहू-आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अमोल ७ मार्चला सायंकाळी पावणेसातला चिंचवड स्टेशन येथे आले होते. दरम्यान, ते चिंचवड स्टेशन येथील प्रदीप स्वीट्ससमोर दुचाकी उभी करून खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले असता आरोपीने दुचाकीची डिक्की उघडून डिक्कीमधील दोन सोन्याच्या बांगड्या, एक मोबाइल असा एक लाख २२ हजार ७९६ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पिंपरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, आरोपी अनिल हा चोरी करताना आढळून आला. या घटनेची अधिक माहिती घेतली असता, मूळचा दौंड येथील असलेला आरोपी सध्या पडवळनगर, थेरगाव येथील त्याच्या नातेवाइकाच्या घरी राहण्यास आल्याचे समोर आले. त्यानंतर १५ मार्चला त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आपण हृदयाच्या उपचारासाठी दौंडहून पुण्याला आल्याचे आरोपीने सांगितले. तसेच उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने चोरी केल्याचीही कबुली दिली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी त्याला अटक करून एक लाख २२ हजार ५९६ रुपयांचा ऐवज जप्त केला.
स्वत:च्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी केली सव्वालाखाची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:59 AM