इतवारीत चोरट्यांचा धुमाकूळ : दोन दुकाने फोडली , व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:38 PM2020-01-08T23:38:34+5:302020-01-08T23:40:16+5:30
मंगळवारी रात्री चोरट्यांनी इतवारीच्या तीन नळ चौकात दोन दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी रात्री चोरट्यांनी इतवारीच्या तीन नळ चौकात दोन दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
इतवारीच्या तीन नळ चौकात कसार ओळीत जरीपटका येथील रहिवासी राजकुमार मुलचंदानी यांची भागचंद तोलाराम फर्म आहे. मुलचंदानी जोडे-चपलांचे होलसेल व्यापारी आहेत. चोरट्यांनी आधी मुलचंदानी यांचे दुकान फोडले. सब्बलच्या साह्याने शटर तोडले. दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेले लाखो रुपये पळविले. मुलचंदानी यांच्या दुकानापासून थोड्याच अंतरावर शेखर जैन यांचे लक्ष्मी मेगा मार्ट दुकान आहे. या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटे दुकानात घुसले. दुकानाच्या काऊंटरमध्ये २५० रुपये ठेवले होते. आरोपींनी हे पैसे घेऊन पळ काढला. रात्री २.३० वाजता मुलचंदानी यांना चौकीदाराने सूचना दिली. ते त्वरित दुकानात पोहोचले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी परिसरातील इतर दुकानातही चोरी केल्याचा संशय आल्यामुळे मुलचंदानी यांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना लक्ष्मी मेगा मार्टचे कुलूपही तुटलेले दिसले. त्यानंतर शेखर जैन आणि मुलचंदानी यांनी तहसील पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेत तीन आरोपींचा समावेश आहे. ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांनी आरामात चोरी केली. घटनेच्या वेळी या परिसरात कुणाचेही येणे-जाणे नसते, हे चोरट्यांना माहीत होते. परिसरात यापुर्वीही व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी झाली आहे. हवालाची रक्कम असल्याचा संशय आल्यामुळे एका दुकानात चोरी झाली होती. इतवारी हा व्यापारी आणि रहिवासी परिसर आहे. येथे चोरी करणे सोपे नाही. तहसील पोलिसांची परिसरात गस्त असते. व्यापाऱ्यांनी आपले सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत. तरीसुद्धा चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी दुपारी गांधीबागमध्ये रिक्षासह ८६ हजाराच्या गारमेंटचे पार्सल चोरी केले होते. या घटनेचा खुलासा होण्यापूर्वीच दोन दुकानात चोरी झाली. तहसिल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. शेखर जैन यांनी केवळ २५० रुपये गेल्यामुळे तक्रार दाखल केली नाही तर मूलचंदानी यांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.