मुंबई - गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस, मनसेसह अनेकांनी विरोध दर्शवला होता. तर, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून एक आव्हानही देण्यात आलं होतं. त्यानंतरही, मुंबईतील मीरारोड परिसरात त्यांचा दरबार भरवण्यात आला. मात्र, पहिल्याच दिवशी दरबारात आलेल्या महिलांच्या मंगळसुत्र अन् दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे, आधीच वादग्रस्त ठरलेल्या बाबांचा दरबार आता आणखी वादग्रस्त बनला आहे.
बागेश्वर बाबाचा १८ आणि १९ मार्च रोजी मीरारोड परिसरात हा दरबार भरवण्यात आला होता. त्यासाठी, मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली, त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू झालेला आणि रात्री ९.३० वाजता संपला. मात्र, या गर्दीत चोरट्यांनी आपला हात साफ केला. महिलांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करण्यात आली असून सुमारे ५ लाख रुपयांपर्यंतचे दागिने चोरट्यांनी चोरले आहेत. त्यामध्ये, मंगळसूत्राशिवाय सोनसाखळीही चोरीला गेल्याचा या महिलांचा आरोप आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३६ महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील चैन चोरी गेल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एकूण ४ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी, सध्या काही जणांची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
बाबांचा कार्यक्रम आधीच वादग्रस्त बनला
“कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु आपल्याला कोणालाही पुरावे देण्याची गरज नाही. ज्यांना आपल्यापासून समस्या आहे, त्यांनी येऊन पुरावा घ्यावा. ज्यांना गरज आहे, त्यांनी यावं आम्ही मलम लावू, पॅरासिटॅमॉलची गोळी देऊ,” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी विरोध करणाऱ्यांना म्हटले आहे. “त्यांनी पहिले माझ्या भक्तांचा सामना करावा. संपूर्ण भारत आमचा आहे. आम्ही लोकांना शिक्षित करून सनातनशी जोडूनच राहू. भारतातील मंत्र आणि भारतातील ऋषि मुनींमध्ये किती ताकद आहे, हे आम्ही त्यांना सांगू,” असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या दरबारात जय सितारामसह छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या.