इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील डॉक्टर प्रशांत राजाराम घाडगे ( रा. लोणी देवकर, घाडगेवस्ती) येथून बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २१ तोळे सोन्याची चोरी केली. ही घटना शनिवारी ( दि. २७ ) रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात घाडगे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पण पोलिसांच्या धास्तीने सोमवारी ( दि. २९) रोजी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर, दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, त्यात २१ तोळे सोने ( जसेच्या तसे ) आढळून आले. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे घाडगे यांच्या पत्नी सविता, मुलगी आर्या हे सकाळी सात वाजता हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर त्यांची आई देखील सकाळी दहा वाजता इंदापूर येथे नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री दहा वाजता घरी आल्यानंतर घराला फक्त कडी लावली असल्याचे दिसून आले. त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी शेजारी जाऊन आमच्या घरी कोण आले होते का असे विचारले असता शेजाऱ्यांनी कोणी घरी आले नसल्याचे सांगितले व रात्री आठ वाजेपर्यंत घराला कुलूप होते असेही सांगितले. तेव्हा घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उघडून ५ लाख ९३ हजार रुपये किमतीचे २१ तोळे सोने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर रविवार ( दि. २८ ) रोजी इंदापूर पोलिसांच्या वतीने सकाळी ७ वाजता पुण्यावरून श्वान पथक मागविण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी सर्वत्र तपासणी करून, श्वान पथकाला संपूर्ण परिसर फिरवून, घटनास्थळी कपाटावरील बोटाचे ठसे घेतले, अशी दोन तास पुरावे गोळा करून सकाळी १० वाजता इंदापूर पोलीस ठाण्यात पुढील तपास करण्यासाठी आले. मात्र त्यावेळी पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा व त्यांची संपूर्ण मॉक ड्रिल पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला होता. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे, शैलेंद्र औटे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बडे, जगदीश चौधर, बापू मोहिते, अमित चव्हाण, विक्रम जाधव यांनी घटनास्थळी तातडीने पाहणी करून पुरावे जमा केले होते. त्यानंतर सोमवारी ( दि. २९) रोजी सकाळी ६ वाजता, शारदा घाडगे यांनी त्यांच्या घराचे दार उघडले तर, दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला, तो त्यांनी उचलून पाहिला असता, त्यात २१ तोळे सोने ( जसेच्या तसे ) आढळून आल्याचे घाडगे यांनी इंदापूर पोलिसांना फोन करून सांगितले. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरट्यांच्या दिशेने जलद चक्र फिरवल्याने त्यांच्या शोधाच्या धसक्यानेच अज्ञात चोरट्याने सोने परत दारात आणून ठेवले, त्यामुळे इंदापूर पोलिसांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याची ही इंदापूर तालुक्यातील पहिलीच घटना आहे. __________________________________________ घाडगे कुटुंबानी केला सर्व पथकाचा सत्कार...लोणी देवकर येथील घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने जलद हालचाली केल्यानेच आमचे चोरीचे गेलेले सोने सापडले अशी भावना इंदापूर पोलीस ठाण्यात डॉ. प्रशांत घाडगे, सविता घाडगे व त्यांची मुलगी आर्या यांनी व्यक्त करून, पोलिसांना त्या लहानग्या मुलीने थंक्यु अंकल म्हणत, पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या दालनात सर्व पथकाला पुष्पगुच्छ व हार श्रीफळ देऊन, त्यांना पेढे भरवून त्यांचे आभार मानले.
इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 8:34 PM
चोरीस गेलेले सोने तसे परत मिळणे कठीणच.. पण चोरांनी पोलिसांची एवढी धास्ती घेतली की त्यांनी चोरीचे सोने गुपचूप आणून ठेवले
ठळक मुद्देडॉग स्कॉडची कमाल : इंदापूर पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी