बातमी छापून बदनामी करण्याची धमकी, दोन खंडणीखोर पत्रकारांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 03:33 PM2021-02-05T15:33:50+5:302021-02-05T15:33:57+5:30
माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून त्यासंदर्भात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
माणगाव : माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवून त्यासंदर्भात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
तक्रादार रमेश भोजा शेट्टी (रा. पुणे) यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग येथे येऊन त्यांच्या मौजे शिलीम (ता. माणगाव) येथील २८ एकर शेतीमध्ये शासकीय योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मत्स्यसंवर्धन योजनेचा लाभ घेतला; परंतु प्रत्यक्षात काम केले नाही. म्हणून पत्रकार भिवा पवार आणि राजन पाटील यांनी त्यांना माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती घेऊन ती प्रसिद्ध करून बदनामी करू, अशी धमकी देत होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून ५ लाखांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तडजोडीअंती २ लाख देण्याचे मान्य केले आहे, असे सांगून त्या दोघांविरुद्ध खंडणीची तक्रार दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नावले व पथकाने गोरेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील मुंबई- गोवा महामार्गाच्या बाजूला, लोणेरे (ता. माणगाव) येथे पंचांसह सापळा लावून दोन्ही आरोपींना तक्रारदार यांच्याकडून ठरल्याप्रमाणे २ लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात स्वीकारत असताना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपी हे सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे, (ता. माणगाव) येथे २००७ पासून शिक्षक म्हणून काम करत असून, शिक्षकाची नोकरी करत करत एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आरोपींकडून रोख रक्कम दोन लाख, दोन मोबाइल, असा एकूण २ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील दोन आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.