वाघाच्या शिकारप्रकरणी तीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 06:10 PM2020-01-12T18:10:26+5:302020-01-12T18:13:24+5:30
आरोपींना वनकोठडी, वाघाचे दात व नखे गायब
चंद्रपूर - ब्रम्हपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रातील भुज उपवन परिक्षेत्रातील मुडझा बिटामध्ये शनिवारी एका पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोन आरोपिंना अटक करण्यात आली आहे. सदर शिकार वाघाच्या मौल्यवान वस्तू विकण्याच्या लालसेने झाली असावी, असा तर्क लावण्यात येत आहे. यातील दोघांना ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले असता त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वाघाचे डोके व पंजे मिळाले परंतु दात व नखे मिळाली असल्याचे वनविभागाने सांगितले.
आरोपी बाजीराव म्हशाखेत्री वय 61, राकेश झाडे वय 32 यांना अटक करून ब्रम्हपुरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले,तर तिसरा आरोपी यशवंत बोभाटे असून याची चोकशी सुरु आहे. सर्व आरोपी मुडझा येथील रहिवासी असून सात आठ दिवसापूर्वी आरोपी बाजीराव म्हशाखेत्री याच्या मालकीची गाय मुडझा बिटात वाघाने मारली होती. त्याचा राग म्हणून त्याने वाघालाच संपवून टाकण्याचा प्रयत्न केला व मृत गाईच्या मांसावर विषारी औषधी टाकून वाघाला संपविण्यात आले. सोबतीला आरोपी राकेश झाडे याला घेऊन वाघाचे मुंडके व पाय कापण्यात आले. वाघाचे मौल्यवान दात, नखे व अन्य वस्तू विकून माया जमविण्याच्या लालसेने हे कृत्य केले असावे, असा वनविभागाने अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी सकाळी दोघांनाही हिसका दाखवताच त्यांनी वाघाचे मुडके व पंजा लपवून ठेवलेली जागा दाखवून वन विभागाने त्या ठिकाणावरून मुंडके व पंजे हस्तगत केले आहे. परंतु वाघाचे दात व नखे प्राप्त झाले नसल्याने आरोपी यशवंत बोभाटे रा. मुडझा याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी बाजीराव म्हशाखेत्री व राकेश झाडे यांना ब्रम्हपुरी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे.