मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवार उद्यान परिसरात तिघा जणांना दोन किलो चरस सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला असून जप्त चरसची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे.सोमवारी रात्री १० च्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पथक मीरारोडच्या शिवार उद्यान परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही तरुणांचा संशय आला. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हातातील पिशवीमध्ये चरस हा अमली पदार्थ आढळून आला.
धक्कादायक! देशी दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
पोलिसांनी लागलीच नदीम अब्दुल रहीम चौगुले (२७), दाऊद मकबूल अन्सारी (२५), अर्षद सलाऊद्दीन खान (२६) ह्या तिघांना अटक करून चरसच्या साठ्या सह मीरारोड पोलिसांच्या स्वाधीन केले. ह्या दरम्यान यांचा एक साथीदार रहेमान हा मात्र पळून गेला. आरोपींकडून २ किलो २० ग्रॅम चरस जप्त केले असून त्याची बाजारात किंमत ८ लाख ८ हजार रुपये इतकी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मीरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम हे करत आहेत. सदर चरस आरोपींनी कुठून आणले होते व त्याची कोणाला विक्री करणार होते हे तपास नंतर उघड होण्याची शक्यता आहे.