चोऱ्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घातल्या बेड्या; १५ गुन्हांची झाली उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:23 PM2019-12-19T19:23:06+5:302019-12-19T19:29:02+5:30
मानपाडा पोलिसांची कामगिरी
डोंबिवली - घरफोडी, चोरी, मंदिरातचोरीचा प्रयत्न यासारखे गुन्हे करणाऱ्या तीन चोरटयांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली. यांच्याकडून घरफोडी आणि चोरीचे १५ गुन्हे उघड करत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल भानुदास काटकर, पोलीस नाईक प्रीतम काळे, भगवान चव्हाण, किरपन, पोलीस कॉन्स्टेबल सोपान काकडे, सुधाकर भोसले हे पथक सोमवारी परिसरात गस्त घालत होते. यावेळी, संशयास्पदरित्या फिरणाऱ्या आकाश छोटेलाल मिश्रा (२१, रा. पिसवली, कल्याण) आणि जावेद सिद्दीकी (१९, रा. नवी गोविंदवाडी, कल्याण) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या दोघांनी २ घरफोडी, ४ कारटेप चोरी, १ दुचाकी चोरी तसेच पिंपळेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न या सारख्या ९ गुन्हयांची कबुली पथकाला दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.
तसेच, पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब यांच्यासह पोलीस हवालदार दामू पाटील, पोलीस नाईक मधुकर घोडसे, विजय कोळी, संदीप बर्वे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मंझा, प्रवीण किनारे, संतोष वायकर यांच्यासह सोमवारी रात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. गस्तीदरम्यान संशयास्पद फिरणा-या गौरव भिकाजी कदम (२३, रा. आंबेडकर नगर, अंबरनाथ) आणि एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या दोघांनी मिळून ४ घरफोड्या आणि २ चोरीच्या गुन्हयांची कबुली दिली. चोरीला गेलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.