लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा (मंगेश कराळे) : रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी सोमवारी पकडले आहे. आरोपींकडून पोलिसांनी ३९ मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करत चार गुन्ह्यांची उकल केली आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रात्री घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागल्याने सदर आरोपींचा शोध घेऊन पायबंद करणेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. गुन्हे पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तपासाला सुरुवात केली. गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदाराने माहिती दिल्यावर नक्षत्रधारी चौहान (४३), कन्हैया यादव (४०) आणि रामरतन निशाद (३०) या त्रिकुटाला मालजीपाडा येथून सोमवारी शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून विविध कंपनीचे ३९ स्मार्ट मोबाईल फोन व गुन्हे करण्यासाठी वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तिन्ही सराईत आरोपींकडून वालीव येथील तीन आणि पेल्हार येथील एक असे चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. आरोपींचा ताबा तपास व चौकशीसाठी वालीव पोलिसांना देण्यात आला आहे. वसई न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट तीन)