लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या त्रिकुटाला बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पाच लाख २२ हजार रुपये किमतीचे अफीम हस्तगत करण्यात आले आहे.सुरेश कुमहार, सोमाराम प्रजापती आणि भरत चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला परिसरात काही जण अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक सचिन साळवी आणि नितीन भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी.एस. सानप, हवालदार टी.के. पावशे, पोलीस नाईक नितीन भोसले, सचिन साळवी, साबीर शेख, जी.एन. पोटे, राजाराम सांगळे आदींच्या पथकाने दुर्गाडी परिसरात सापळा रचला. पहाटे ३.३० च्या सुमारास जुन्या दुर्गाडी पुलावरून हे तिघे जण बाइकवर एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्रजापतीकडे एक किलोपेक्षा अधिक अफीम आढळून आले. चौकशीत राजस्थानमधून कल्याणमध्ये विक्रीसाठी हे अफीम आणल्याचे त्यांनी सांगितले.दोन दिवसांची कोठडीच् बाजारात या अफीमची किंमत पाच लाख २२ हजार रुपये असून, ५०० रुपये प्रतिग्रॅम अशी त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या तिघांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.च् तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली.
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 1:46 AM