पेण : सरत्या वर्षा अखेरीस माणुसकीला काळिमा फासणारी घटना पेणमध्ये घडली. आदिवासी समाजाच्या तीन वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी, ३४ वर्षीय आदेश मधुकर पाटील यास अटक करण्यात आली आहे.
पेण शहरानजीकच्या प्रायव्हेट हायस्कूलजवळच्या पांचोळा आदिवासीवाडी आदिवासी लोकवस्तीमधील ३ वर्षीय बालिकेवर तिच्या घरातून बुधवारी पहाटेच्या सुमारास उचलून नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपीस अपहरण, बलात्कार, निर्घृण हत्या व पॉक्सो, ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचा पेणच्या समस्त नागरिकांनी निषेध केला असून, अतिजलद न्यायालयात हा खटला चालवून आरोपीस फाशी देण्याची मागणी केली आहे. या घटनेची दखल घेत, रायगडचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी पोमन, पी.आय. कदम, पेण पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आदी अधिकाऱ्याचे तपास पथक कामाला लागले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, अलिबागवरून श्वानपथक, फिंगर प्रिंट पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास करून पुरावे गोळा करण्याचे काम केले. घटनेचे वृत्त पेणमध्ये पसरताच विविध संघटना, आदिवासी समाजातील लोक, राजकीय कार्यकर्ते यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी कायदा सुव्यवस्था भंग होऊन नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक रुग्णालय परिसरात तैनात ठेवण्यात आली होती. यामुळे पेणमध्ये छावणीचे स्वरूप आले होते.