मुंबई : ठिकाण : भायखळा स्थानक, वेळ : सायंकाळची, अचानक फलाट क्रमांक दोन वरून एक मुलगी रेल्वे रुळांवर उतरली. त्याचवेळी अप दिशेने लोकल धडाडत येत होती. ती त्या गाडीच्या मार्गात येत असल्याचे फलाटावरील लोकांना दिसताच एकच आरडाओरडा सुरू झाला. रेल्वे पोलीस तत्काळ सतर्क झाले. सहायक उपनिरीक्षक रवींद्र सानप आणि सुरक्षारक्षक गजानन मुसळे यांनी पळत जाऊन मुलीला रुळांवरून बाजूला केले. लोकल आणि ती मुलगी यांच्यातील अंतर अगदीच थोडे उरले होते. सुदैवाने गाडीचा वेग कमी होता...
प्रेमभंगातून नैराश्य आलेल्या मुलीने भायखळा स्थानकात आत्महत्येचा दोनदा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी घडला. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आपण त्याला आत्महत्येची धमकी दिली. त्यानेही ती गांभीर्याने घेतली नाही. म्हणून आत्महत्या करण्यास निघाले होते, असे संबंधित मुलीने पोलिसांना सांगितले. जीआरपी भयखळ्याचे पोलीस निरीक्षक विलास काकड, कॉन्स्टेबल नीता धोंगडे, कॉन्स्टेबल पूजा जाधव आणि डेप्युटी स्टेशन मॅनेजर प्रथमेश सावंत यांनी मुलीची समजूत काढली. स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या प्रियकरालाही बोलावून घेण्यात आले. उभयतांची समजूत काढल्यानंतर ते एकत्र जाण्यास तयार झाले.