आशिष राणे वसई - स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्युटीवर असताना तत्परतेने वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या एका पोलिस हवालदाराने समोरून लोकल ट्रेन येत असताना वसई रेल्वे ट्रॅक मध्ये जीव देण्यासाठी उभ्या असलेल्या एका 60 वर्षीय महिलेचा जीव वाचवला आहे.11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास डहाणू अंधेरी लोकल ट्रेन फलाट क्रं 5 वर येत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलीस हवालदार एकनाथ नाईक असं या जिगरबाज लोहमार्ग पोलिस हवालदारांचे नाव असून नाईक यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे या महिलेला एकार्थाने जीवदान मिळाले आहे. सुभद्रा शिंदे वय 60 राहणार नालासोपारा असे या महिलेचे नाव असून सदर महिलेची विचारपूस केली असता ती तणावाखाली असल्याचं प्रथमदर्शनी समजतेय.
या घटने प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रं.5 वर 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास डहाणू वरून अंधेरी येथे जाणारी जलद लोकल वसई स्थानकात येत असताना त्याच रेल्वे ब्रिजवर जीआरपी गोपनीय शाखेचे अनिल गुजर, प्रवीण थोरात आणि इतर सहकारी हे गस्त घालताना एक महिला चक्क लोकल ट्रेनच्या समोर मधोमध रेल्वे ट्रॅकमध्ये उभी आहे हे पाहून तात्काळ या दोघानी लोहमार्ग पोलीस हवालदार एकनाथ नाईक यांना वर्दी दिली असता जराही विलंब न करता एकनाथ नाईक रेल्वे ट्रॅकच्या दिशेने तात्काळ धावले.
सर्वप्रथम त्या मोटरमनला त्यांनी गाडी थांबवायचा इशारा दिला आणि पीडित महिलेला ट्रॅक वरून तात्काळ बाजूस काढले यामुळे नक्कीच तिचे प्राण वाचले आहेत.दरम्यान नाईक यांनी दाखवलेल्या तत्परतेचे व प्रसंगावधान कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत असून वसई रोड लोहमार्ग पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी नाईक व त्यांच्या इतर सहकारी पोलिसांचे अभिनंदन करत त्यांचा हृदय सत्कार केला आहे. माझ्या सहकारी पोलीसांनी वेळीच तात्काळ माहिती दिल्यानेच मी या महिलेचे प्राण वाचवू शकलो या महिलेला जीवदान मिळाले मी धन्य झालो अशी प्रतिक्रिया एकनाथ नाईक यांनी लोकमतला दिली.
मनोरुग्ण महिलेला पाठवलं विरारच्या आश्रमात !सुभद्रा शिंदे या महिलेचे प्राण वाचवल्यावर तिची चौकशी केली असता ती तणावग्रस्त असल्याच लक्षात आले तर विशेष म्हणजे तिच्या पतीचे कर्करोगाने पूर्वीच निधन झाल्यानंतर ती एकटीच राहत होती त्यामुळे विचारात ग्रस्त असलेल्या या महिलेने हे टोकाचे पाऊल उचललं असावे असे पुढे आले तर तिचं मानसिक समुपदेशक केल्यानंतर तिला पोलिसांनी विरारच्या मराठा फाउंडेशन या आश्रमात पाठवले असल्याचे लोहमार्ग पोलीसांनी स्पष्ट केले.