मुंबई - कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या ३० व्या मजल्यावरून उडी मारून जीएसटी अधीक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हरेंद्र कपाडिया (५१) असं आत्महत्या केलेल्या जीएसटी अधीक्षकाचं नाव आहे. काल सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जीएसटी अधिकारी हरेंद्र यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हरेंद्र कपाडिया यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे मागील ८ ते १० महिन्यांपासून हरेंद्र कामाला गेले नव्हते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हरेंद्र यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीच्या ३० व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता हरेंद्र यांनी आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.