Arpita Mukherjee: अर्पिता मुखर्जी यांना अटक; घरात सापडलं होतं २० कोटींचं घबाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:32 PM2022-07-23T19:32:22+5:302022-07-23T19:33:28+5:30
Arpita Mukherjee Arrested: पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्यातून ही रक्कम मिळाल्याचा संशय आहे.
तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. ईडीच्या छाप्यांमध्ये शुक्रवारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्यातून ही रक्कम मिळाल्याचा संशय आहे. सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी अनेकदा अर्पिता मुखर्जीच्या घरी जात असत. यासोबतच पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी टॉलीगंजच्या डायमंड सिटी कॉम्प्लेक्समधील अर्पिता मुखर्जी यांच्या आलिशान घरातून रोख रकमेसह २० मोबाइल फोनही जप्त केले आहेत. ईडी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, हे मोबाईल फोन WBSSC आणि WBBPE मधील शिक्षक भरती घोटाळ्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. ईडीने निवेदनात दावा केला आहे की, शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत होते, यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती.
ईडीने काही बँक अधिकाऱ्यांना रोख मोजण्यासाठी बोलावले. हे अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन अर्पिता मुखर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपासून ईडी छापे टाकत असलेल्या १३ ठिकाणांच्या सुरुवातीच्या यादीत अर्पिता मुखर्जी यांचे निवासस्थान नव्हते. मात्र, छाप्यांदरम्यान अर्पिता मुखर्जी यांचे नाव समोर आले, त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) कर्मचार्यांसह ईडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तपास केला आणि जप्तीची कारवाई सुरू केली. रोख रकमेचा स्रोत आणि इतके मोबाईल फोन कोणत्या उद्देशाने वापरण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी ईडीचे अधिकारी सध्या मुखर्जी यांची चौकशी करत आहेत.
कोण आहेत अर्पिता मुखर्जी?
ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी या बांगला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. अर्पिता मुखर्जी यांनी त्यांच्या फिल्म करिअरमध्ये साइड रोल म्हणून काम केले आहे. बांगला सिनेमासोबतच ओडिया आणि तामिळ सिनेमातही त्यांनी काम केले आहे. अर्पिता मुखर्जी यांनी बांगला सिनेमातील सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांचा लीड रोल असणाऱ्या काही सिनेमातही काम केले आहे. अमर अंतरनाड या सिनेमात त्यांनी अभिनय केला आहे. ईडीच्या कारवाईत अर्पिताच्या घरी २० कोटी रोकड सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितले.
मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय
अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी हे सरकारमधील शिक्षण मंत्री आहेत. मग पार्थ चॅटर्जी आणि सिनेमात साईड रोल करणारी अर्पिता मुखर्जी यांची ओळख कशी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तृणमूलचे नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकातामधील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीचे नेतृत्व करतात. ही कोलकाता येथील सर्वात मोठी दूर्गा पूजा समिती आहे. अर्पिता मुखर्जी २०१९ आणि २०२० मध्ये पार्थ चॅटर्जी यांच्या दूर्गा पुजा सोहळ्यात प्रमुख चेहरा होती. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली.