प्रवाश्यांच्या हुशारीमुळे चोरटे आले पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 05:25 PM2018-07-20T17:25:16+5:302018-07-20T17:27:57+5:30
कुर्ला लोहमार्ग पोलीसांची कारवाई
मुंबई - मुंबईतल्या सर्वात व्यस्त असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाश्यांना तिकीट तपासणी करणाऱ्यांसोबत आमच्या ओळख आहे किंवा नातेवाईक आहे. तसेच शिक्का मारलेले पत्र असले की रेल्वे सीट कंफर्म आणि फुकट जायला मिळेल अश्या भूलथापा देऊन फुकट्या प्रवाश्यांना लुटणाऱ्या तीन जणांच्या टोळी कुर्ला लोहमार्ग पोलिसानी अटक केली आहे. मोहम्मद रफिक अल्लाउद्दीन राईंन (वय - २८) , मोहम्मद दुल्हारे आलमगीर मन्सुरी(वय - २१), मोहम्मद समशेर मोहम्मद आलिम मन्सुरी (वय - २८) हि आरोपींची नावे आहेत. हे सर्व मूळचे बिहारमधील सीतामढी येथे राहणारे असून सध्या नवी मुंबईतील तुर्भेत राहतात.
त्यांच्याकडून लुटलेला 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुंबईत उत्तर भारतात जाण्यासाठी अनेक प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून मोठ्या प्रमाणात सुटणाऱ्या ट्रेन पकडून ते गावी जात असतात. मात्र, या स्थानकात वारंवार अश्या प्रवाश्यांची फसवणूक विविध मार्गाने होत असते. अशाच प्रकारे मंगळवारी गोरखपूर एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी छायाराम रंगीलाल भारद्वाज तिकीट खिडकीच्या रांगेत उभे होते. यावेळी त्यांच्याजवळ आरोपी मोहम्मद अल्लाउद्दीन राईन, मोहम्मद दुलारे अल्लाउद्दीन मंसुरी हे दोघे आले. त्यांची या दोघांनी कुठे जाणार म्हणून विचारपूस केली. तसेच आम्हीपण बस्तीला जात आहोत. आम्हाला तिकिटांची गरज नाही. आमचे भावोजी ऑफिसर आहेत. त्यांचे स्टॅम्प मारलेल पत्र असल्यास फुकट प्रवास करतो. तुम्हाला फुकट प्रवास करायचा का? असे विचारून बतावणी मारून फसवलं आणि भारद्वाज आणि त्याचा सहकारी त्याच्या बोलण्यात अडकले. त्यांनी होकार देताच आरोपींनी त्याला ऑटो रिक्षात बसवून काही अंतरावर घेऊन गेले. त्यांनी एका ठिकाणी रिक्षा थांबवली जिथे त्यांचा तिसरा साथीदार समशेर मोहम्मद आलिम अन्सारी हा होता. त्यांनी या दोघाना मारहाण करून प्रवाश्यांच्या बॅगेमधून सामान तसेच मोबाईल हिसकावून तर घेतलाच तसेच एटीएम कार्ड घेतले. धमकी देऊन एटीएमचा पिन विचारून एटीएममशीनद्वारे साडे अकरा हजार रुपये काढून घेतले आणि तेथून ते फरार झाले. आपण लुटले गेलो याची जाणीव त्यांना झाली. पण गावी जायचं असल्याने ते टर्मिनसला चालत आले. त्याचवेळी ज्यांनी आपल्याला लुटलं ते लुटारू टर्मिनसवर फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यातील चौकीत येऊन पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्या सोबत जाऊन तीनही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता गुन्हा आपण केलाच नाही असे हे आरोपी सांगत होते. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरलेल्या मुद्देमाल परत करीत गुन्ह्याची कबुली दिली. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी भा. दं . वि. कलम ४२०, ४०६ अंतर्गत गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या टोळीत आणखी आरोपी सामील आहेत का? याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी दिली आहे.