लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने पोलीस हवालदाराचा करुण अंत झाला. राजेश विठ्ठलराव कावळे (वय ४७) असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते सक्करदरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.कावळे नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी कर्तव्यावर हजर झाले. दैनंदिन कामात व्यस्त असताना पोलीस ठाण्याच्या डीबी रूमसमोर सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे ते खाली पडले. सहकाऱ्यांनी त्यांना लगेच मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून कावळे यांना मृत घोषित केले. कावळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी मेडिकलमध्ये गोळा झाले. माहिती कळताच कुटुंबीयही पोहचले. कावळे यांच्या परिवारातील सदस्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या. कावळे महालमधील कल्याणेश्वर मंदिराजवळच्या पोलीस वसाहतीत राहत होते. सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा तेथून निघाली. गंगाबाई घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.अतिताणतणावामुळे पोलीस त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकत नाही, हे लक्षात आल्याने यावर्षी आपण पोलिसांना हेल्दी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा मानस पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ६ जानेवारीला पत्रपरिषदेत व्यक्त केला होता. आयुक्तांची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काही योजना कार्यान्वित होण्याच्या तयारीत असतानाच कावळे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
नागपुरात पोलीस हवालदाराचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:11 PM
कर्तव्यावर असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने पोलीस हवालदाराचा करुण अंत झाला. राजेश विठ्ठलराव कावळे (वय ४७) असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते सक्करदरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
ठळक मुद्देकर्तव्यावर असताना हृदयविकाराचा धक्का : सक्करदरा ठाण्यात घटना