टीव्ही चोरणाऱ्या आरोपींना अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:01 AM2018-10-12T01:01:25+5:302018-10-12T01:01:32+5:30
तळोजा परिसरात एसबीडब्ल्यू लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ८४ एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून ६८ टीव्ही हस्तगत केले आहेत.
पनवेल : तळोजा परिसरात एसबीडब्ल्यू लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ८४ एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून ६८ टीव्ही हस्तगत केले आहेत.
या टोळीने गोडाऊन फोडून एकाच वेळी तब्बल ८४ टीव्ही चोरून नेल्यामुळे आयुक्तालय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. पहिल्यांदाच अशाप्रकारचा गुन्हा झाल्याची नोंद होती. या गुन्ह्याचा तळोजा पोलिसांसह गुन्हे शाखाही तपास करत होती. पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ ला मिळालेल्या बातमीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड, सपोनि जगताप, पोलीस नाईक परेश म्हात्रे, संजय पाटील इत्यादीच्या पथकाने सापळा रचून या सहा आरोपींना अटक केली असून, सात लाख १२ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. या आरोपींवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले आणि पथक करीत आहेत.
गोडाऊन फोडणाºया या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? त्यांनी यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का? याचाही पोलीस तपास करत आहेत.