ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:55 AM2021-06-30T05:55:53+5:302021-06-30T05:56:15+5:30
ट्वीटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि गाझियाबाद पोलिसांशी संबंधित विषयावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी पाच जुलैपर्यंत तहकूब केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखला भारताच्या नकाशाबाहेर दाखवल्याबद्दल ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि कंपनीच्या आणखी एका अधिकाऱ्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला. ट्विटर इंडियाने त्याच्या करिअर्स पेजवर भारताचा विपर्यस्त नकाशा दाखवला होता. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहर जिल्ह्यातील पोलिसांनी हा गुन्हा खुरजा नगर पोलीस ठाण्यात नोंदवला. तशी तक्रार सोमवारी सायंकाळी बजरंग दलच्या पदाधिकाऱ्याने दिली होती. नेटिझन्सकडून ट्विटरवर जोरदार टीका झाल्यानंतर वादग्रस्त नकाशा ट्वीटरने काढून घेतला.
सक्तीची कारवाई करू नये
ट्वीटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि गाझियाबाद पोलिसांशी संबंधित विषयावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी पाच जुलैपर्यंत तहकूब केली. उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी वृद्ध मुस्लिम व्यक्तिवरील हल्ल्याबाबत गाझियाबाद पोलिसांनी माहेश्वरी
यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ॲडव्होकेट पी. प्रसन्ना कुमार यांनी उत्तर प्रदेश पोलिसांची बाजू मांडली. त्यांनी सुनावणी तहकूब करण्याची मागणी न्यायमूर्ती जी. नागेंदर यांच्या खंडपीठासमोर केली होती. माहेश्वरी हे बंगळुरूमध्ये राहतात. गाझियाबाद पोलिसांनी त्यांना २४ जून रोजी लोणी बॉर्डर पोलीस ठाण्यात त्या प्रकरणात म्हणणे नोंदवून घेण्यासाठी हजर राहण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर माहेश्वरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गाझियाबाद पोलिसांनी माहेश्वरी यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे न्यायालयाने सांगितले.
१४ जून रोजी समाज माध्यमांवर व्हिडीओ क्लीप आली होती. तिच्यात वृद्ध मुस्लिम व्यक्ती अब्दुल शामद सैफी यांना काही तरूणांनी धक्काबुक्की केली आणि ‘जय श्री राम’ म्हणायला लावले असा आरोप होता.