ओमी कलानीच्या पदाधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 08:55 PM2020-10-23T20:55:05+5:302020-10-23T20:55:38+5:30
Ulhasnagar Firing Accused Arrested : जुन्या रागातून व जिवेठार मारण्याच्या संशयातून जीवघेणा हल्ला केल्याची कबुली आरोपी यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर : ओमी कलानी टीमचा पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार व जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने फक्त २४ तासात नाशिकवरून अटक केली. जुन्या रागातून व जिवेठार मारण्याच्या संशयातून जीवघेणा हल्ला केल्याची कबुली आरोपी यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगरातील ओमी कलानी टीमचे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड बुधवारी रात्री ११ वाजता मित्र जहागीर मोरे यांच्या सोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. त्यावेळी कार मध्ये दबा देऊन बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला करून गोळीबार केला. त्यावेळी परिसरात पेट्रोलींग करणारी पोलीस गाडी चौकात आल्याने, संदीप यांनी समयसूचकता दाखवून पोलिसांच्या गाडीचा आश्रय घेतला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. कार मधून पळून जाणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र हल्लेखोरांनी कार उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात टाकून धूम ठोकली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करून २४ तासात आरोपीना नाशिक येथून अटक केली. हितेश गुलबीर ठाकूर व सागर किरण शिंदे हे दोन्ही आरोपी उल्हासनगर येथील शहाड फाटक व चोपडा कोर्ट परिसरातील राहणारे असल्याचे उघड झाले. त्यांनी हल्ल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
संदीप गायकवाड यांच्या वरील हल्ला प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी हल्लेखोरांचा तपासासाठी ३ पोलीस पथके स्थापन केल्याची माहिती दिली होती. तसेच ठाणे खंडणी विरोधी पथकाने समांतर तपास करून अवघ्या २४ तासात आरोपीने गजाआड केले. देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याचे उघड झाले असून अधिक तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे. हल्ल्यात जखमी झालेले संदीप गायकवाड यांच्यावर श्राद्ध हॉस्पिटल येथे उपचार होत असून त्यांनी जीवाला धोका असल्याचे सांगून पोलीस सरंक्षण मागितले आहे.