रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:46 AM2019-11-30T01:46:46+5:302019-11-30T01:47:14+5:30
टेम्पोमधून रक्तचंदनाची तस्करी करणाºया दोघांना मानखुर्द येथे अटक करण्यात आली आहे.
मुंबई : टेम्पोमधून रक्तचंदनाची तस्करी करणा-या दोघांना मानखुर्द येथे अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष ७ चे पोलीस अधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानखुर्द येथे सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून १ कोटी ३४ लाख रूपये किमतीचे एकूण १३४० किलो वजनाचे एकूण ५३ रक्तचंदनाचे लाकडी ओंडके हस्तगत करण्यात आले.
२८ नोव्हेंबरला काही इसम मुंबईतल्या मानखुर्द येथे बेकायदा रक्तचंदनाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे पोलीस अधिकारी मनीष श्रीधनकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मानखुर्द येथे सापळा रचला. काही वेळातच मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर संशयित टेम्पो पोलिसांना दिसला. पोलिसांनी तो थांबवून त्याची तपासणी केली. या वेळी पोलिसांना प्लास्टीक व खाकी रंगाच्या गोणीमध्ये गुंडाळून ठेवलेले ५३ लाकडी ओंडके आढळले.
टेम्पोतील इसमांना याबद्दल विचारले असता त्यांनी हे रक्तचंदन असून ते मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या वेळी वनाविभागाच्या अधिकाºयांनी या लाकडी ओंडक्यांची पाहणी केली आणि ते रक्तचंदन असल्याचे पोलिसांना सांगितले. परदेशी निर्यात करण्याचा आणि विक्रीचा कोणताही परवाना नसूनदेखील बेकायदा वाहतूक करून रक्तचंदन जवळ बाळगल्याने तसेच रक्तचंदन ही सरकारी मालमत्ता असूनही दोन आरोपींनी त्याची चोरी केली. यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, पोलिस उपआयुक्त (प्र १) श्री अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त (डी पूर्व) शेखर तोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गु.प्र.शा, गु.अ.वि. कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे व पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, स‘हाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तूद, आनंद बागडे आदींनी ही कारवाई केली.