येरवडामधील तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:19 AM2020-09-10T10:19:02+5:302020-09-10T10:30:43+5:30
अनिल वेताळ याला मारहाण करुन लुट केल्याचा गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर, विशाल खरात याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात चिखली पोलिसांनी अटक केली होती.
पुणे - जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले व कोरोना पॉझिटिव्ह असलेले दोन कैद्यांनी पहाटे येरवडा तात्पुरत्या कारागृहातून पलायन केले आहे. अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा. गणेशनगर, भीमा कोरेगाव, ता. शिरुर) आणि विशाल रामधन खरात (रा. समर्थ सोसायटी, निगडी) अशी पळून गेलेल्या दोघा कैद्यांची नावे आहेत.
अनिल वेताळ याला मारहाण करुन लुट केल्याचा गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. तर, विशाल खरात याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात चिखली पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना येरवडा तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे ठेवताना केलेल्या चाचणीत दोघेही कोरोना पॉसिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.
या कारागृहातील बिल्डिंग क्रमांक ४ मधील पहिल्या मजल्यावरील रुममध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे हे दोघेही सर्वांची नजर चुकवून पळून गेले. या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. आतापर्यंत अनेक कच्चे कैदी या कारागृहातून पळून गेले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यापैकी काही जणांना पुन्हा अटक केली आहे.
मात्र, इतरांपेक्षा या दोघांची केस वेगळी आहे. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते जेथे जेथे जातील तेथे इतरांना कोरोनाचा संसर्ग पोहचविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दोघे बाहेर राहणे धोकादायक ठरु शकते. या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घ्यावे व येरवडा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन येरवडा पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना केले आहे.