खवल्या मांजर विक्री प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:11 PM2020-02-10T22:11:05+5:302020-02-10T22:12:13+5:30
जिवंत खवल्या मांजराची विक्री करताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना सावनेरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिवंत खवल्या मांजराची विक्री करताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना सावनेरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या खवल्या मांजराला न्यायालयाच्या आदेशानुसार निसर्गमुक्त करण्यात आले असून प्रकरणाच्या अधिक तपासासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मध्यप्रदेशात रवाना झाले आहेत.
संजय लहानुजी गजभिये, माणिक शालीकराम बेटे आणि मुन्ना बुद्धू बेटे अशी या आरोपींची नावे आहेत. खापा वनपरिक्षेत्रावत खापा-सावंगी रोडवर ८ फेब्रुवारीच्या सायंकाळी सिनेस्टाईल पाठलाग करून या आरोपींना जिवंत खवल्या मांजरासह पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहन आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. खवल्या मांजरला ट्रँझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हा प्राणी तंदुरुस्त असल्याचे लक्षात आल्यावर सोमवारी दुपारी त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार निसर्गमुक्त करण्यात आले.
या तिन्ही आरोपींंना सोमवारी सावनेर प्रथम श्रेणी नायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, तिघांचाही दोन दिवसांचा फॉरेस्ट कस्टडी रिमांड मिळाला आहे, यापैकी दोन आरोपी मध्यप्रदेशमधील असल्यामुळे सखोल तपासासाठी सहायक वनसंरक्षक एस. टी. काळे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक हे मध्यप्रदेशात तपास करीत आहेत.