एकाच दिवसात पोलिसांना दमदाटी करण्याच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:47 PM2018-12-28T17:47:36+5:302018-12-28T17:48:26+5:30
बॅनर लावण्यावरुन तसेच वाहनचालकाला थांबविल्याच्या कारणावरुन अशा दोन घटनेत तिघा जणांनी पोलिसांना दमदाटी केली.
पुणे : बॅनर लावण्यावरुन हटकले तसेच वाहनचालकाला थांबविल्याच्या कारणावरुन दोन घटनेत तिघा जणांनी पोलिसांनी दमदाटी करुन शासकीस कामात अडथळा आणण्याच्या घटना गुरुवारी घडल्या़.
पहिल्या घटनेत येरवडा पोलिसांनी दत्ता पोळ (रा़. मंगळवार पेठ) आणि निता आडसुळ (रा़. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत पोलीस हवालदार के़ एम़ शेख यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. शेख हे बुधवारी रात्री पर्णकुटी पोलीस चौकीत अंमलदार म्हणून काम करत होते़. मध्यरात्री बाराच्या सुमारास पर्णकुटी चौकी समोरील चौकात लोक फ्लेक्स लावत असल्याचे दिसल्याने चौकीचे मार्शल बारोटे व खरात यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायला सांगितले़. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते बॅनर्स लावत असल्याचे दिसले़. त्यांना तुमच्याकडे परवानगी आहे का, परवानगी नसेल तर बॅनर्स लावू नका, असे सांगितले़. तेव्हा दत्ता पोळ व निता आडसुळ हे पर्णकुटी पोलीस चौकीत आले व मार्शल समजावून सांगत असताना त्यांना दमदाटी करुन शेख व इतरांनी त्याचे सरकारी कामात अडथळा निर्माण केला़.
दुसरी घटना शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडली़. शिवाजीनगर पोलिसांनी वाहनचालक वैजनाथ नामदेव गाडेकर (वय २७, रा़. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याला अटक केली आहे़. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार डी़. पी़. गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. गायकवाड यांनी गाडेकर याची गाडी थांबविली़. त्यावरुन त्याने मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन गायकवाड यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली़. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे़.