ठाणे : ठाण्यातील सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन (४३, रा. निळकंठ सोसायटी, मखमली तलाव, ठाणे) यांच्या दुकानात दरोडा टाकल्यानंतर त्यांची हत्या करणाऱ्या टोळक्यांपैकी दोघांना नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. अटकेतील एका आरोपीकडून सुमारे एक लाखांचे तब्बल सव्वा किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या जैन यांचा मृतदेह शुक्रवारी कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत आढळून आला. निळकंठ सोसायटीमध्ये वास्तव्याला असलेल्या जैन यांचे चरईतील दगडी शाळेजवळ दत्त अपार्टमेंटमध्ये बी. के. ज्वेलर्स हे दुकान आहे. १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या ज्वेलर्सच्या दुकानात गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. सुरुवातीला ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर त्यांच्या अपहरणाचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, २० ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह मिळाल्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी या खूनाच्या तपासासाठी दोन पथकांची निर्मिती केली. याच पथकांनी व्यापाऱ्याचे अपहरण आणि खून प्रकरणातील दोघांना कल्याणमधून अटक केली. अटकेतील एकाच्या घरातून याच दुकानातून लुटलेले तब्बल सव्वा किलोचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. या टोळीतील अन्य दोघे उत्तरप्रदेश किंवा मध्यप्रदेशात पसार झाल्याची शक्यता असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेतील अन्य दोघेजण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. शिवाय, तपास अपूरा असल्यामुळे अटकेतील दोघांची नावे उघड करता येणार नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.