मोटरसायकल चोरीसह पोलिसांवरही हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघे आंबिवलीतून जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:45 AM2021-03-31T02:45:13+5:302021-03-31T02:48:00+5:30
Crime News : मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोड्या, वाहनचोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली.
ठाणे - मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोड्या, वाहनचोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सात मोटरसायकली आणि चार मोबाइल असा पाच लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोटरसायकलींची चोरी केल्यानंतर त्यांचा वापर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीची जबरीने चोरी करण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील शांतीनगर, माणकोली त्यापाठोपाठ ठाणे शहरातील कळवा, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ जणांच्या एका टोळीने एकाच दिवशी मोटरसायकल चोरी करून एका पोलीस बिट मार्शलवर हल्ला झाल्याची घटना २१ मार्च रोजी घडली होती. हा तपास सुरू असताना या टोळीतील दोघे जण आंबिवलीच्या इराणीवाडीत दडून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे, अंमलदार आनंदा भिलारे, रवींद्र पाटील, रिझवार सय्यद, विक्रांत कांबळे आणि तेजश्री शेळके आदींच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडीत २७ मार्च रोजी छापा टाकून दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मोटरसायकली इराणीवाडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीस पथकाने चोरीच्या सात मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या. दोघांना अटक करून चौकशी केली असता, आठ जणांची टोळी यामध्ये असून या टोळीने एकाच दिवशी आठ मोटरसायकली चोरी केल्याची बाब समोर आली.
इतर ठिकाणीही चोरी केल्याची दिली कबुली
एक मोटरसायकल भिवंडी येथे एका पोलिसाच्या अंगावर चढविण्याच्या प्रयत्नात घसरल्यामुळे ती तिथेच टाकून या दोघांनी इतर साथीदारांच्या मोटरसायकवरून पळ काढला होता. भिवंडी, ठाणे आणि मुलुंड परिसरातून या मोटरसायकली चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली. या मोटरसायकली इराणी वाडीतील सराईत सोनसाखळी चोरांना चोरी करण्यासाठी विकणार होते अशी धक्कादायक माहिती दोघांच्या चौकशीतून समोर आली आहे. गुन्हे शाखेने या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.