लंडनहून परतलेल्या डॉक्टरला अडीच कोटींना विकला 'अल्लाऊद्दिनचा दिवा'
By कुणाल गवाणकर | Published: October 29, 2020 11:45 AM2020-10-29T11:45:46+5:302020-10-29T11:47:47+5:30
दोन आरोपींना पोलिसांकडून अटक; एका महिलेचा शोध सुरू
मेरठ: तुमच्या सगळ्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील, अशी बतावणी करत दोन जणांनी लंडनहून परतलेल्या एका डॉक्टरला 'अल्लाऊद्दिनचा दिवा' विकल्याची घटना घडली आहे. त्यासाठी दोघांनी डॉक्टरकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळले. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अल्लाऊद्दिनचा दिवा म्हणून साधा दिवा विकून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच लंडनहून परतलेल्या डॉ. लईक खान यांनी खैरनगरमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणं गाठलं. यानंतर पोलिसांनी तथाकथित अल्लाऊद्दिनचा दिवा जप्त करत दोन आरोपींना अटक केली. २०१८ मध्ये आपण समीना नावाच्या एका महिलेच्या संपर्कात आल्याची माहिती खान यांनी पोलिसांना दिली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ड्रेसिंग करण्यासाठी ते अनेकदा तिच्या घरी जायचे.
'समीनाच्या घरी मला इस्लामुद्दिन नावाचा तांत्रिक भेटला. आपल्याकडे बऱ्याच शक्ती आहेत. त्यातून मी तुला कोट्यधीश करेन, असं आश्वासन इस्लामुद्दिननं मला दिलं. त्यानंतर तांत्रिकानं मला अल्लाऊदिनचा दिवा देण्याचं वचन दिलं. त्या दिव्यातून जिन बाहेर पडत असल्याचंही त्यांनी मला दाखवलं. मी दिवा घरी नेतो असं त्यांना अनेकदा म्हटलं. पण मी दिव्याला हात लावल्यावर आक्रीत घडेल, असं ते दोघे म्हणायचे,' असं डॉ. खान यांनी पोलिसांना सांगितलं.
अल्लाऊदिनच्या दिव्यातून बाहेर पडणारा जिन म्हणजे इस्लामुद्दीन असल्याचं एके दिवशी डॉ. खान यांच्या लक्षात आलं. अल्लाऊदिनच्या दिव्याच्या बदल्यात आरोपींनी माझ्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा दावा खान यांनी केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी पोलीस ठाणं गाठलं आणि मेरठच्या अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर ब्रह्मपुरीचे सर्कल ऑफिसर अमित राय यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. इस्लामुद्दीन आण अनीस अशी दोघांची नावं आहेत. तर समीनाचा शोध सुरू आहे.