बेराेजगार पित्याने मुलाचाच घेतला जीव! नाेकरी गेली, भीकही मागितली; अखेर उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:44 AM2022-08-21T08:44:22+5:302022-08-21T08:45:34+5:30
आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
सांचौर (जालौर) :
आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मुकेश असे क्रूर पित्याचे नाव असून, तो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नलोधर गावचा रहिवासी आहे.
आरोपीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. कामधंदा नसल्याने घर चालविणे कठीण झाल्याने त्याने पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट आखला. मुलाला आजी-आजोबांकडे सोडण्याचा बहाणा करून तो पत्नी, मुलाला घेऊन गुजरातहून राजस्थानला आला. सिद्धेश्वर (सांचौर) गावात यात्रेकरूंसाठीच्या भंडाऱ्यात त्याने जेवण केले. पत्नीला खोटे सांगून तो मुलाला घेऊन गेला. काही अंतरावर जाऊन त्याने मुलाला कालव्यात फेकले.
सात महिन्यांपूर्वी माझी सुरक्षारक्षकाची नोकरी गेली. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मी भीकही मागितली, असे मुकेशने सांगितले.
२० किमीवर मिळाला चिमुरड्याचा मृतदेह
पोलीस मित्र काना राम (वय ४३) यांनी पती-पत्नीला मुलासह पाहिले होते. मात्र, थोड्या वेळाने या जोडप्याकडे मूृल नव्हते. संशय आल्याने त्यांनी सांचौर पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिद्धेश्वरपासून २० कि.मी.वर तेतरोल येथे या मुलाचा मृतदेह आढळून आला.