नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार पीडित तरुणी २८ जुलैला झालेल्या कार आणि ट्रक अपघात गंभीर जखमी झाली होती. बलात्कार पीडितेला मारण्याचा हा कट होता का याबाबत तपास करणाऱ्या सीबीआयने दोन महिन्यात आरोपपत्र दाखल केले. मात्र, या प्रकरणात सीबीआयने जो पहिला एफआयआर नोंद केला आणि शुक्रवारी जे आरोपपत्र दाखल केले, यात तफावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. या अपघात प्रकरणी घटनास्थळी असलेल्या बऱ्याच प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बातचीत करून पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा केले होते.
नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर कुलदीप सिंह सेंगर याने 2017 रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर सेंगर याची भाजपाकडून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. हा अपघात नसून हल्ला असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.
रायबरेली येथे झालेल्या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील एम्स रुग्णालयात पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरू होते. त्यामुळे उन्नाव बलात्कार प्रकरणाची एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तिला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची दिल्लीतच राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्ली न्यायालयाने दिले होते.