कानपूर:उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. दिवसा ढवळ्या शहाजहानपूरच्या न्यायालयात घुसून एका वकिलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर कोर्टातील इतर वकीलांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. आरोपीने गोळीबारानंतर बंदूक तिथेच सोडून पळ काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना आज दुपारी 12 च्या सुमारास घडली. आरोपीने न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील ACJM कार्यालयात जाऊन जलालाबादचे रहिवासी वकील भूपेंद्र प्रताप सिंह यांच्यावर गोळी झाडली. घटनेच्या वेळी कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हतं. दरम्यान, भर दिवसा थेट न्यायालयातच हत्या झाल्याने एकच गोंधळ उडाला.
आरोपीने भूपेंद्र सिंह यांच्यावर गोळी झाडताच मोठा आवाज झाला, यानंतर कोर्ट परिसरातील इतर वकील घटनास्थळाकडे धावले, पण तोपर्यंत आरोपी गुन्ह्यात वापरलेली बंदूक तिथेच टाकून पसार झाला. हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त वकिलांनी कोर्टात गोंधळ घातला. पोलीसांनी मृत वकिलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.