कणकवली - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी कणकवलीत दाखल झाली. राणे यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यातच शहरातील नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात ही शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी याबाबत पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह - कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबतच्या दोन स्वतंत्र तक्रारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिल्या आहेत.
शुक्रवारी रात्री ८ ते ११ या दरम्यानच्या काळात मिरवणूक काढून, शिवसेना कार्यालयानजीक बेकायदा जमाव करून अनेक आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी शिवसेनेमधून आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर, रिमेश चव्हाण, शैलेश भोगले, भूषण परुळेकर, सचिन सावंत, महेश कांदळकर, भाई कासवकर, यकिन खोत, राजू राठोड व आदी १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीही बेकायदा जमाव करून, मिरवणूक काढून येथील नरडवे चौक येथे आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यानुसार भाजपचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, संतोष कानडे, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, सुरेंद्र कोदे, शिशीर परुळेकर व आदी ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली.