वसईकरांचे आरोग्य धोक्यात; पनीर पाठोपाठ भेसळयुक्त मिठाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 09:18 PM2019-02-18T21:18:57+5:302019-02-18T21:23:05+5:30
सोमवारी दुपारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या पथकाने बापाने रोडवर वाकीपाडा येथे कृष्णा मंगल डेअरी व स्विट मार्ट येथे छापा घातला.
वसई - वसई विरार शहरात विविध भेसळयुक्त पदार्थ बनविण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पालघर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे येथील दोन डेअऱीवर छापा घालून तब्बल अडीचशे किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. ही मिठाई बुरशी लागलेली आणि दुर्गंधीयुक्त होती. मागील आठवड्यातच पोलिसांनी अडीच हजार किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले होते.
सोमवारी दुपारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या पथकाने बापाने रोडवर वाकीपाडा येथे कृष्णा मंगल डेअरी व स्विट मार्ट येथे छापा घातला. या ठिकाणी अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता गलिच्छ वातावरणात मिठाईचा साठा आणि मिठाई बनवली जात असल्याचे दिसून आले. या साठ्यात मिल्क केक, पेढे, बर्फी आणि लाडू यांचा समावेश होता.. कृष्णा मंगल डेअरी येथे अंदाजे एकूण ११० किलो बुरशी व दर्गंधीयुक्त मिठाई तसेच अंदाजे १५० किलो पुर्नवापर करून बनविलेली बनावट मिठाई अशी एकूण २५० किलो बनावट मिलावटी भेसळयुक्त मिठाई मिळून आली. मागील आठवड्यात पोलिसांनी कारवाई करून अडीच हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला होता.