परभणी/हिंगोली : मटण आणण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रांजोना गावातील तीन व्यक्ती परभणी जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्यात दारू पिल्यानंतर वाद झाला. या वादातून दोघांनी एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सिंगणापूर शिवारात घडली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मारोती डिगंबर साळवे (३४) हा हयातनगर येथे मटन आणण्यासाठी म्हणून ४ जून रोजी दुपारी ३ वाजता घरून गेला होता. परतला नाही म्हणून त्याचा शोध घेतला. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हट्टा पोलीस ठाण्यात मारोती साळवे हे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हट्टा पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. पोलिसांना मारोती साळवे हा त्याच्याच गावातील गजानन साळवे व देविदास साळवे यांच्या सोबत दारु पिताना दिसला होता, असे समजले. वेगवेगळी पथके नेमून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चौकशी दरम्यान वेगळीच माहिती समोर आली. त्यामध्ये या दोघांनी मारोती साळवे याला मटण आणण्यासाठी परभणी येथे दुचाकीवर आणले.
परभणीत त्यांनी दारु घेतली. त्यानंतर पंढरपूरला सोबत जाऊ म्हणून गंगाखेडकडे जाताना सिंगणापूर शिवारात असलेल्या गंगाखेड रस्त्यावरील कॅनॉलवर तिघांनी दारु पिली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपी गजानन साळवे व देविदास साळवे यांनी ४ जून रोजीच सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मारोती साळवे याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचे प्रेत, मोबाईल व चपला कॅनॉलच्या पाण्यात टाकल्या. हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व त्यांच्या पथकाने आरोपींच्या नातेवाईकांसह संबंधित घटनास्थळी जाऊन पाहणी केली व ताडकळस पोलिसांना एक प्रेत मिळाल्याची माहिती मिळाली. मयताच्या नातेवाईकांनी सदर प्रेत हे मारोती साळवे याचेच असल्याचे ओळखले.
१३ जूनपर्यंत पोलीस कोठडीमयत मारोती साळवे यांचे नातेवाईक मारोतीराव जोगदंड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हट्टा पोलिसांनी या आरोपींना ताडकळस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस नाईक नय्यर शेख, इम्रान कादरी, प्रवीण चव्हाण, होमगार्ड पाईकराव, आठवले यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना परभणी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.