परतवाडा (अमरावती) : पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोराळा (ता. अचलपूर) गावातील २० वर्षीय गरोदर मातेचा मृत्यू झाला. सदर विवाहिता व तिच्या गर्भातील चिमुकला जीव अंधश्रद्धेचे बळी ठरले. यात संबंधित भूमकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात समजाविण्यासाठी गेलेल्या डॉक्टरच्या अंगावर कुटुंबीय धावून गेले. डॉक्टरांनी तशी तक्रार पथ्रोट पोलीस ठाण्यात दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोराळा येथील २० वर्षीय महिला आठ महिन्यांची गरोदर होती. तिचे हे पहिलेच बाळंतपण होते. १५ जून रोजी तिला श्वसनास त्रास जाणवू लागला. बोराळा आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांनी १६ जून रोजी तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून तिला उपचारार्थ अमरावतीला रवाना करण्यात येत असतानाच, कुटुंबीय रात्री तिला बोराळा येथे घेऊन आले. वैद्यकीय पथकाने १७ जून रोजी परत तिची व कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. संबंधितांनी तिला लगतच्या गावातील भूमकाकडे नेले. यादरम्यान १८ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
मृत्यूची माहिती मिळताच परत उपकेंद्राचे डॉ. विशाल दाभाडे, डॉ. प्राजक्ता पाचबोले, परिचारिका दीपाली शिंदे या मृताच्या घरी दाखल झाल्या. पथ्रोट पोलिसांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने तो मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा प्रशासनास अपेक्षित आहे.
बोराळा येथील २० वर्षीय गरोदर महिला १८ जूनला दगावली. दवाखाना सोडून ते गावात दाखल झालेत. औषधोपचार नाकारत भूमकाकडे गेले. ती अंधश्रद्धेचा बळी, असून संबंधितांनी डॉक्टरलाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पथ्रोट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.- डॉ. विशाल दाभाडे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपकेंद्र, बोराळा