नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी आज दिल्लीच्या तख्तावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला असून या मोर्च्याला हिंसक वळण लागलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन (परेड) पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. मात्र पोलिसांची मुभा नसलेल्या दुसऱ्या मार्गाने शेतकरी दिल्लीत प्रवेश करत असल्याने दिल्लीत लाल किल्ला परिसरात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. पोलीस त्या मार्गाने जाऊ देत नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडिओत पोलीस जवान हिंसक शेतकऱ्यांच्या जमावात सापडतो, मात्र एक वृद्ध शेतकरी त्या पोलिसाला सुरक्षितपणे जमावातून बाहेर काढतो.
दिल्लीत शेतकरी आणि पोलीस आंदोलकांमधील परिस्थिती सध्या चिघळली असून आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेट्स पाडले आहेत. आंदोलक ट्रॅक्टर आणि घोड्यावर स्वार होऊन हातात लाठीकाठी आणि तलवारी घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्याने परिस्थिती चिघळली आहे. एका व्हिडीओमध्ये संतप्त शेतकरी आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलिसाची सुटका करण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याने धाव घेतली. दिल्लीत सध्या पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. पोलीस आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. या परिस्थितीत हा पोलीस जवान संतप्त शेतकऱ्यांच्या तावडीत सापडल्याने आंदोलक त्याच्यावर हल्ला करतील अशी भीती तो व्हिडीओ पाहताना वाटत होती. मात्र एका वृद्ध शेतकऱ्याने हिंसक जमावाला समजावून त्या पोलिसांची सुखरूप सुटका केली. दक्षिण दिल्लीमधील आयटीओ परिसरात हा प्रकार घडला. शेतकरी आंदोलकांच्या गराड्यातून त्या पोलिसाला वृद्ध शेतकरी आंदोलकाने कोणतीही इजा न पोहचवता सुखरूपपणे सुटका करतानाचे दृश्य व्हिडिओत दिसत आहे.