गावठी दारू गाळणारा सहा महिन्यांकरिता स्थानबद्ध; एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्ह्यातील पहिली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 09:47 PM2021-05-06T21:47:09+5:302021-05-06T21:48:05+5:30
Crime News : पोलीस सूत्रांनुसार, सदर इसमावर यापूर्वी हातभट्टीची दारू तयार करणे, अवैध दारूची वाहतूक व विक्री करणे इत्यादी प्रकरणात विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : हातभट्टीची दारू गाळणे व त्याची विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर पावले उचलून तालुक्यातील येवती येथील आरोपी नरेंद्र संगीतराव सोनबावणे (३५) याला सहा महिन्यांसाठी अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही जिल्ह्यातील पहिली कारवाई ठरली.
पोलीस सूत्रांनुसार, सदर इसमावर यापूर्वी हातभट्टीची दारू तयार करणे, अवैध दारूची वाहतूक व विक्री करणे इत्यादी प्रकरणात विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. पण त्यावर या कारवाईचा काहीही परिणाम झाला नसल्याने याला आळा बसावा, यासाठी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी या इसमाला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून सूत्राद्वारे माहिती मिळवून सदर इसम सराईत हातभट्टीवाला असल्याची खात्री झाल्यावर त्याला सहा महिन्यांसाठी अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश ५ मे रोजी पारित केला. त्यानुसार नांदगाव पोलिसांनी या इसमाचा शोध घेऊन अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले.
ही कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, प्रवीण अंबाडकर तसेच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, चंद्रकांत कोष्टी, प्रशांत बेलोकर, राजेश इरपाते यांनी ही कारवाई केली.