४५ कोटींचा चुना लावणाऱ्या विनोद सुराणा आणि संतोष मुथीयान यांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:42 PM2018-10-25T17:42:25+5:302018-10-25T17:43:24+5:30
आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पोलिसांनी या दोघांच्या काल औरंगाबाद येथून मुसक्या आवळल्या. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात पोलीस कोठडीकरिता हजर करण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मुंबई - राहुल गुप्ता यांनी घरांच्या योजनेत ४५ कोटी गुंतविले होते. याबाबत सामंजस्य करार मुंबईत झाला होता. मात्र, प्रकल्पात गुप्ता यांची आरोपी विनोद सुराणा आणि संतोष मुथीयान यांनी फसवणूक केल्याचे उघड झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पोलिसांनी या दोघांच्या काल औरंगाबाद येथून मुसक्या आवळल्या. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात पोलीस कोठडीकरिता हजर करण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
याप्रकरणी जुहू पोलिस ठाणे मुंबई येथे दाखल ४५ कोटी रुपये फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास औरंगाबादला वर्ग करण्यासाठी दाखल फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी फेटाळला होता. मुंबई येथील राहुल गुप्ता यांनी औरंगाबादेतील चिकलठाण्यातील घरांच्या योजनेत ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एकूण १७९ घरांच्या प्रकल्पात त्यांचे भागीदार औरंगाबादचे विकासक संतोष मुथीयान आणि विनोद सुराणा हे आहेत. यासंबंधी सामंजस्य करार मुंबई येथे करण्यात आला होता. या प्रकल्पात ४५ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार गुप्ता यांनी जुहू पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार मुथीयान आणि सुराणा यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ४२०, १२० (ब) व ३४; तसेच मोफा (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स) अॅक्ट २, ३, ४, ११, १३ नुसार गुन्हा जानेवारी २०१३ साली दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा औरंगाबाद येथे घडल्याने तपास औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने करावा, अशी विनंती दोन बिल्डरांनी औरंगाबादच्या तत्कालिन पोलिस आयुक्तांकडे केली होती. मात्र, ही विनंती अमान्य केल्याने दोघांनी खंडपीठात धाव घेतली.
फौजदारी अर्जात गुन्हा औरंगाबादला घडल्याने येथे तपास करावा, अशी विनंती करण्यात आली होती. खंडपीठाने फौजदारी अर्ज निकाली काढताना हस्तक्षेपास नकार देत तपास तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांशिवाय मुथीयान व सुराणायांच्याविरुद्ध १३ कोटींचा चेक बाउन्स झाला म्हणून गुप्ता यांनी मुंबईच्या न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, अखेर या गुन्ह्याच्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील नोंदविण्यात आल्याने या शाखेने ही कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.