आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क
By हेमंत बावकर | Published: October 19, 2020 09:40 AM2020-10-19T09:40:59+5:302020-10-19T09:43:39+5:30
Assam-Mizoram border issue: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे.
आसाम-मिझोरामच्या बॉर्डरवर शनिवार- रविवार रात्रीच्या सुमारास हिंसाचार उफाळून आला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी रविवारी रात्री दोन्ही राज्यांच्या सीमेवरील परिस्थिती पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला कळविली आहे. तसेच मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्याशी चर्चाही केली आहे.
पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आसामच्या कछार जिल्हा आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यातील सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे.
सोनोवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा भाग वेगाने विकास करत आहे. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच त्यांच्यातील संबंध चांगले व्हायला हवेत. सोनोवाल यांनी सांगितले की, मतभेद असू शकतात परंतू सर्व मतभेदांमध्ये चर्चा करूनच तोडगा काढला पाहिजे.
मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी आंतरराज्य सीमेवर शांतता कायम ठेवणे आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कछार जिल्ह्यातील लायलपूर भागात शनिवारी सायंकाळी आसाम आणि मिझोराम राज्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले. लैलापूर भागात या गटांनी अनेक घरांना आग लावली. दुसरीकडे आसामचे वनमंत्री परिमल सुखावैद्य यांनी रविवारी लायलपूर भागाचा दौरा केला. तसेच शांतता राखण्याचे आवाहन केले.