कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 02:07 PM2021-02-07T14:07:24+5:302021-02-07T14:09:36+5:30

Drug Case : ड्रग्ज प्रकरणाची  होणार पुन्हा सुनावणी; एनसीबीच्या प्रयत्नाना मिळतेय यश

The way is open for the release of 'that' couple who are serving their sentences in a Qatari prison | कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा

कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा

Next
ठळक मुद्दे २०१९ मध्ये ६ जुलै रोजी कतारच्या दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना १० वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली.

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कतारच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईच्या निर्दोष जोडप्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकड़ून  (एनसीबी) करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे या जोडप्याच्या ड्रग्ज प्रकरणावर पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय कतारच्या न्यायालयाने घेतला आहे.

मुंबईकर असलेले मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी  दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. २०१९ मध्ये ६ जुलै रोजी कतारच्या दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना १० वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात ओनीबा ही ३ महिन्याची गर्भवती होती. आपल्या मुलगी आणि जावयाला अडकवण्यात आल्याचा विश्वास असल्याने २७ सप्टेंबर रोजी ओनीबाचे वडील शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे धाव घेत आपली मुलगी आणि जावई निर्दोष असून त्यांना यात अडकवल्याची तक्रार दिली. 

शकील यांनी नातेवाईक तबसुम रियाज कुरेशी आणि तिचा साथीदार निझाम कारा यांच्यामुळे ते यात अडकल्याचा दाट संशय व्यक्त केला होता. तबसुमने त्यांना लग्नाची भेट म्हणून कतारचे हनीमुन पॅकेज दिले. सोबत कतारच्या नातेवाईकांकडे देण्यासाठी एक पार्सल सोबत दिल्याचेही शकील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले. कतारला नवीन सीमकार्ड घ्यावे लागणार असल्याने तेथेच साधा फोन विकत घेणार असल्याने ठरवत दोघांनी त्यांचे मोबाईल घरीच ठेवले. याच मोबाईलमध्ये तबसुम, निझाम कारा यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंग कुरेशी यांनी एनसीबीकडे दिले आहे. 

           

कुरेशी यांच्या याच तक्रारीच्या आधारे एनसीबीचे क्षेत्रीय उपसंचालक के.पी.एस मल्होत्रा यांनी याप्रकारणाचा तपास सुरु केला. २२ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यांत निझाम कारा आणि तबसुमला १३ ग्रम कोकेनसह अटक केली. तर दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज रँकेट प्रकरणात १ किलो ४७४ किलो चरसच्या तस्करीत वेद राम, महेश्वर, शाहनवाज गुलाम चोराटवाला आणि शबाना  चोराटवाला यांना बेेडया ठोकल्या. त्यांच्या तपासात निझाम कारा आणि त्याची पत्नी शाहिदाने शाहनवाज आणि शबानाला ही ड्रग्ज दिल्याचे समोर आले. यासाठी निझामच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने हे पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले होते.

    

गेल्या वर्षी  ७ सप्टेंबर रोजी निझामला बेल मिळताच एनसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर १४ ऑक्टोबर रोजी निझाम कारा आणि शाहिदा त्यांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच तबसुम मार्फ़त कुरेशी दाम्पत्याला यात अडकवल्याचे स्पष्ट झाले. आणि चरसची बँग सोबत सोपवली. सध्या हाच धागा पकड़ून एनसीबी पथक कतार दुतावासाच्या मदतीने या जोडप्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. एनसीबीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश मिळताना दिसत आहे. यात, कतारच्या न्यायालयाने याबाबत पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एनसीबीकड़ून याबाबतचे पुरावे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या जोडप्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. 

चिमुकली  झाली १ वर्षाची 

यात कारागृहात जन्मलेली त्यांची मुलगी अयात एक वर्षाची झाली आहे. ती सध्या कतारमध्येच असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.

 

Web Title: The way is open for the release of 'that' couple who are serving their sentences in a Qatari prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.