३२ वर्षानंतर कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल; खून करणाऱ्या ७ आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 04:32 PM2019-11-30T16:32:36+5:302019-11-30T16:32:55+5:30
एका खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण न्यायालयाने निर्णय देत सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
टिटवाळा :- कल्याण तालुका(टिटवाळा) पोलीस ठाण्यात सिआरपीसी १०३/८७ नुसार दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कल्याण न्यायालयाने निर्णय देत सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, कल्याण तालुक्यातील गेरसे गाव येथील राहणारे फिर्यादी नारायण दिवाणे यांच्या फिर्यादीनुसार मयत हरिभाऊ बाबु दिवाणे यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील तब्बल ११ एकर जमिनीसाठी ना हरकत दाखल न दिल्याचा राग मनात ठेवून आरोपी बाळू उर्फ लखा यशवंत गायकर (रा.वाशिंद),भाऊ धर्मा दिवाणे, लक्ष्मण शंकर दिवाणे, सुरेश आंबो गायकर, एकनाथ धर्मा दिवाणे (सर्व राहणार-गेरसे) यांनी पूर्व नियोजित कट व आपसात संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तलवार, कुऱ्हाडी, काठ्या, ऍसिड बल्ब, सुरुंगाची काडतुसे घेऊन याचा वापर करून मयत हरिभाऊ बाबू दिवाणे व फिर्यादी नारायण दिवाणे यांच्यावर हल्ला केला होता.
याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. १०३/८७, से.के.न.६८/९६ तसेच पुरवणी दोषापत्र ९४/९६ भादंवि ३०२,३०७,३२६,३२४,१४७,१४८,१४९ भारतीय स्फोटक अधिनियम कलम ५(३) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचे अन्वेषण पो.उपनिरीक्षक भरत सरवदे (सध्या सेवानिवृत्त) यांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या सातही आरोपी विरुद्ध अपराध केल्याचा सबळ पुरावा सिद्ध झाल्याने सदरील आरोपीना कलम ३०२ नुसार जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ( दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद) तसेच भादंवि १४८ मध्ये २ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने कैद) व भादंवि ३२४ मध्ये २ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने कैद) अशी शिक्षा कल्याण सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावली आहे.
सदर केस मध्ये सरकारी वकील म्हणून गजानन चव्हाण तसेच मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनिरी ए.एस.घनघाव,पो/हवा ४०७ एस बी कुटे,मपोशी परदेशी, मपोशी गोपाळे यांनी कोर्ट कर्मचारी व मपोना डी.डी.पाटील यांनी काम पाहिले.