अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली. आज कोर्टाने त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारीमध्ये गुन्हे शाखेनं मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकून अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात कुंद्रा मुख्य आरोपी असून, त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात राज कुंद्रा अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळला तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते. काय आहे यासंबंधी कायद्यात तरतूद
पोर्नोग्राफी म्हणजेच अश्लील चित्रपट आणि त्यासंबंधित प्रकरणाशी भारतात कडक कायदे आहेत. अशा प्रकरणात गुन्हा दाखल करताना माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबर (आयटी) आयपीसीच्या विविध कलमांचाही समावेश केला जातो. तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे कायद्यामध्ये दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत.
व्हिडीओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लील आणि लैगिंक शोषणाचा प्रसार करणारं साहित्य बनवणे तसेच इतरांना पाठवणं हे पोर्नोग्राफी प्रतिबंध कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडीओ बनवणंही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणंही गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. अलीकडच्या काळात चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणात आरोपी दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भा.दं.वि. कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
कोणते कलम ?
या प्रकरणी माहित व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७, ६७ अ आणि भादंवि कलम २९२, २९३, ४२०, ३४ आणि इन्डेसन्ट रेप्रेसेंटेशन ऑफ वुमन (प्रोहिबिशन) ऍक्ट ३, ४, ६, ७ अन्वये मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.