गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील जंगलात शनिवारी चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. चार पोलीस जवानही जखमी झाले आहेत. या नक्षलवाद्यांवर काही लाखांत इनाम होते. मिलिंद तेलतुंबडेवर सर्वाधिक मोठी रक्कम ठेवण्यात आली होती.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांची चहुबाजूंनी कोंडी केल्याने ते हतबल झाले. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतला. नक्षलवाद्यांचा म्होरक्या तेलतुंबडे मारला गेला की नाही हे सांगितले जात नव्हते. अखेर घोषणा करण्यात आली.
दलसू राजू गोटा, दलपत कचलानी यांच्यासह सात जणांवर प्रत्येकी चार लाखांचा इनाम होता. प्रदीप जाडेवर सहा लाख, किशन उर्फ जैमन आणि सन्नू यांच्यावर प्रत्येकी 8 लाख रुपये, महेश रावजी गोटा याच्यावर 16 लाख, लोकेश पोडयामवर 20 लाख आणि तेलतुंबडेवर 50 लाख असा एकूण 1.38 कोटी रुपयांहून अधिकचे इनाम या नक्षलवाद्यांवर ठेवण्यात आले होते.