घर साफ करताना तिने केली पत्नी असल्याची बतावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:17 AM2018-11-20T00:17:52+5:302018-11-20T00:19:13+5:30
चोरीचा नवीन फंडा कल्याणमध्ये उघड झाला आहे. चोरट्या तरुणीने घराचे कुलूप तोडून आतील एक लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. मात्र, त्याचदरम्यान घरमालकाने आॅनलाइन मागवलेली वस्तू कुरिअर बॉय घरी घेऊन आला.
कल्याण : चोरीचा नवीन फंडा कल्याणमध्ये उघड झाला आहे. चोरट्या तरुणीने घराचे कुलूप तोडून आतील एक लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. मात्र, त्याचदरम्यान घरमालकाने आॅनलाइन मागवलेली वस्तू कुरिअर बॉय घरी घेऊन आला. चोरट्या तरुणीने आपण त्या व्यक्तीची पत्नी असल्याचे सांगत त्याच्याकडून पार्सल स्वीकारले. या आॅनलाइन आॅर्डरमुळेच चोरीचा प्रकार उघड झाला आहे.
खडकपाडा परिसरात श्याम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विपुल होवाळ (३३) यांनी आॅनलाइनद्वारे भिंतीवरील दोन घड्याळांची आॅर्डर १० नोव्हेंबरला नोंदवली होती. त्यांनी ही वस्तू कल्याण आणि कांदिवली अशा दोन ठिकाणी मागवली होती. १३ नोव्हेंबरला सकाळी ८ च्या सुमारास होवाळ हे कल्याण येथील घरी आले. त्यावेळी त्यांना आॅर्डर दिलेले घड्याळ घरातील सोफ्यावर आढळले. घरात कोणी नसताना आॅर्डर कोणी घेतली, असा प्रश्न होवाळ यांना पडला. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनी आणि कंपनीच्या एजन्सीकडे माहिती काढली. घड्याळे घरपोच देणाºया कुरिअर बॉयने होवाळ यांना सांगितले की, ‘मी १३ नोव्हेंबरला दुपारी २ च्या सुमारास घरी गेलो होतो. त्यावेळी, घरातील मुलीने कुरिअर घेण्यास नकार दिला. माझे पती घरात नसल्याने ती वस्तू शेजाºयांकडे द्या, असे ती म्हणाली. त्यावर, आम्ही शेजारी वस्तू देत नाही. आॅर्डर करणाºयालाच देतो, असे मी तिला सांगताच तिने पार्सल स्वीकारले.’
पोलिसांकडे तक्रार
होवाळ यांचे पार्सल तरुणीने स्वीकारल्याची माहिती कुरिअर बॉयने दिली. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी कपाट तपासले असता एक लाख ५८ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे समजले. तरुणीच्या विरोधात त्यांनी खडकपाडा पोलिसांकडे तक्रार दिली.