ज्याच्या अंत्यसंस्काराची सुरू होती तयारी; तोच युवक गर्लफ्रेंडसोबत जिवंत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 03:21 PM2023-09-15T15:21:15+5:302023-09-15T15:21:51+5:30
९ सप्टेंबर रोजी मेरठच्या दौराला भागात डोके आणि हात कापलेले एक मृतदेह आढळून आला होता.
मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका नाल्यातून पोलिसांना डोके व हात नसलेला मृतदेह सापडला होता. शेजारील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बेपत्ता तरुण म्हणून त्याची ओळख पटली परंतु अंत्यसंस्काराच्या काही तासांपूर्वी चंदीगडमध्ये हा युवक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जिवंत सापडला. त्यानंतर नाल्यात सापडलेला मृतदेह आता मेरठ पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
९ सप्टेंबर रोजी मेरठच्या दौराला भागात डोके आणि हात कापलेले एक मृतदेह आढळून आला होता. मेरठ पोलिसांनी वायरलेसवर संदेश दिल्यानंतर मुझफ्फरनगर पोलीस सतर्क झाले. काही दिवसांपूर्वी मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर भागात एका कुटुंबाचा २० वर्षांचा मुलगा मॉन्टी कुमार बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय मेरठमधील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले. त्यांच्या बेपत्ता मुलाच्या मानेवर आणि हातावर टॅटू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याची ओळख लपवण्यासाठी मारेकऱ्यांनी शरीराचे हे अवयव कापले असण्याची शक्यता आहे. या आधारे कुटुंबीयांनी मृतदेह मॉन्टी कुमारचा असल्याचे म्हटलं.
यानंतर हा मृतदेह मुझफ्फरनगरला आणण्यात आला आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. दरम्यान, माँटी कुमार हा चंदीगडमध्ये १८ वर्षीय तरुणीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमप्रकरणामुळे मुलगी माँटीसोबत घरातून पळून गेली होती. तर मुलीच्या कुटुंबीयांनी मन्सूरपूर पोलिस ठाण्यात माँटीविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल केला होता.
मन्सूरपूरचे एसएचओ आशिष चौधरी यांनी सांगितले की, आम्ही मोबाईल फोनच्या तपासणीनंतर मॉन्टी आणि मुलीचा शोध घेत होतो. कुटुंबियांनी ज्या मृतदेहावर दावा केला तो घरातील बेपत्ता युवक नव्हता. त्यामुळे मेरठ पोलिसांनी मृतदेह पुन्हा शवागारात आणला. मी सकाळी उठलो तेव्हा माझी मुलगी घरी नव्हती. एका शेजाऱ्याने मला सांगितले की मॉन्टीने तिला मोटारसायकलवरून सोबत नेले होते. तिने सोबत दागिने आणि ५० हजार रुपये घेतले होते. यानंतर आम्ही ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली असं मुलीच्या वडिलांनी सांगितले. दुसरीकडे, नोना गावचे प्रमुख रॉबिन चौधरी म्हणाले की, जेव्हा मॉन्टी कुमारच्या कुटुंबीयांना मेरठमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना वाटले की हा मृतदेह त्यांच्या मुलाचा आहे. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिस पुरेसे काम करत नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनही केले होते.