लोणी काळभोर : थेऊर (ता हवेली) येथे दोन वर्षांपूर्वी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर विमा कंपनीकडून पतीने काढलेल्या विमा पॉलिसीमुळे दोन लाख रुपये मिळाले. मात्र, माणुसकीहीन सासू, सासरे, दीर यांना त्या पैशांची मागणी करु लागले. ते पत्नी देत नसल्याने चिडून त्यांनी पत्नी, तिचा भाऊ आणि आईला लाकडी दांडके व हाताने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १९ ) दुपारी घडली. यासंदर्भात सिमा रामदास जाधव ( वय ३४, रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचे सासरे सखाराम साहेबराव जाधव, सासू अरूणाबाई सखाराम जाधव, दिर विनायक साहेबराव जाधव व त्याचा मुलगा शशिकांत विनायक जाधव( चौघे रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली ) यांचे वर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फिर्यादी सिमा यांचेसह त्यांचा भाऊ रामदास वसंत चव्हाण, आई जिन्सबाई वसंत चव्हाण( तिघे रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली ) यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमा यांचे पती रामदास जाधव यांचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले आहे. त्यानी विमा पॉलिसी काढली होती. त्यांचे मृत्यूनंतर सदर पॉलिसीची दोन लाख रुपये रक्कम वारसदार म्हणून त्यांची पत्नी सिमा यांना मिळाली आहे. सदर रक्कम आपणांस मिळावी म्हणून सासरे सखाराम, सासू अरूणाबाई, नणंद रूपाली संजय चव्हाण हे सिमा हिस सतत शिवीगाळ करत होते. परंतू दोन लाख रुपये दोन मुले व एका मुलीच्या भवितव्यासाठी ठेवले आहेत. मी तुम्हाला देणार नाही. असे तिने सांगितलेने ते तिचे आई - वडिल व भावावर चिडून होते. मंगळवारी दुपारी १ - ३० वाजण्याच्या सुमारास सिमा यांचे बंधू रामदास चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत असताना सखाराम जाधव यांनी दुचाकी अडवून त्यांना शिवीगाळ केली व तुझी बहीण २ लाख रुपये देत नाही बघतो तुझ़्याकडे असे म्हणून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सिमा व त्यांच्या आई जवळ असल्याने भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना सखाराम जाधव यांनी काठीने तर सासू अरूणाबाई जाधव, दीर विनायक जाधव व त्याचा मुलगा शशिकांत विनायक जाधव यांनी हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करचे हे करत आहेत.
पतीच्या मृत्यूनंतर मिळालेले विम्याचे पैसे देत नाही म्हणून पत्नीसह नातेवाईकांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 9:08 PM
दोन वर्षांपूर्वी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने पतीचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देसासू सासरे, दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल